Saturday 3 October 2015

१९-२२ सप्टेंबर २०१५


मला नेहेमी वाटायचे की आपण टिळक, गांधी, राम, कृष्ण, शिवाजीच्या काळात जन्म घेऊन त्यांची भेट घेतली असती. आज ती ईच्छा डॉ प्रकाश व मंदा आमटे सारख्या महामानवांना भेटुन पुर्ण झाली. असा अनुभव पुर्वी कधी न आल्यामुळे, मला लिहुन ठेवावासा वाटला. तसं अश्या भावना शब्दात बांधणे कठिण असते. प्रकाश भाऊंच्या ईंग्लंड दौर्याचा वृत्तांत डॉ रोकडेंकडुन कळाला. लंडनमधे कार्यक्रम ठरला तो रोकडेंनी आमच्यांवर (प्रत्यक्ष न भेटता) विश्वास ठेवला म्हणुन. अश्या कार्यक्रमाचा पुर्वीचा अनुभव मला नव्हता. सिध्दार्थ आणि आरसी (राहुल चिंबाळकर) हे देखील माझ्यासारखे नवखे. सगळ्यांच्या मनात एकच विचार की, एवढ्या मोठ्या हस्तीचा कार्यक्रम आहे, आपल्यामुळे काही गालबोट, चुक व्हायला नको. कार्यक्रमाची आखणी आणि स्वयंसेवकांची फळि तयार करणे, लोकांना आर्थिक मदतीसाठी अपिल करणे, हे सगळे नविनच. प्रकाश भाऊ व मंदा वहिनींना ईंग्लंडमध्ये मोकळ भेटलो ते किंग्सक्रॉस स्थानकावर. तिथेच त्यांना कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली. मुलाखतीत विचारणारे प्रश्न दाखवले. कुठल्याच गोष्टीवर नकार किंवा परखड मत नाही. हे म्हणजे अजुन आमच्या डोक्यावर प्रेशर. कारण आमटेंची होती तेवढी पुस्तक चाळली होती आणि अंदाज होता की परीस्थिती कशीहि असली तरी तक्रार आमटेंकडुन येणार नाही. त्यामुळे स्वत:ची (सद्सदविवेक) बुद्धि लावुन योग्य निर्णय घेणे आले. मंदा वहिनींना मराठी किंवा हिंदी जास्त सोईचं एवढीच जुजबि टिप्पणी. सिध्दार्थची सुत्रसंचलनाची तयारी त्याच्या अॉफिसच्या कामाच्या लोडमुळे रात्री ऊशिरापर्यंत चालु असायची. आरसी बाक़ी व्यवस्था पाहण्यात गुंग असायचा. आमच्या बायकांनीपण बर्याच जबाबदार्या डोक्यावर घेतल्या. एवढेच काय मल्हार आणि ईशान यांनी मुले असुन बरीच काम केली. एखाद्या चँरीटी कार्यक्रमासाठी तिकीटे ठेऊन हाउसफ़ुल होण्याचा हा विरळाच प्रसंग. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी मी आमटे कुटुंबियांना घ्यायला स्टेशनवर गेलो. साधुसंत येती घरा तोची दिवाळी दसरा याचा प्रत्यय आम्हाला खराखुरा येत होता. त्यांना घरी आणतांना, मनात सण असल्याचा आनंद नक्कीच होता. येतांना गप्पा अगदी माझ्या लहानपणीपासुनच्या ओळखीच्या काकांशी करतोय, असे वाटत होते. एवढे सोप संभाषण अश्या व्यक्तीशी मला अपेक्षित नव्हते. त्यात त्यांनी काहि नामांकित व्यक्तींचे नाव ईतक्या सहजतेने घेतले तेहि चेहेर्यावर कुठलाही मोठेपणाचा मागमुस न दाखवता. या नामांकित व्यक्तींच्या बाबतीत कधी आदर वाढणारी तर कधी कमी होणारी माहिती मिळत होती. याचे कारण, जे आहे जसे आहे तसे, कुठलाही मुलामा न लावता बोलणे चालु होते. पण तिथे कुणाची निंदा करायचा उद्देश्यही अजिबात नव्हता. प्रकाशभाऊ बोलले रात्री ट्रेनमधिल चिज सँडविच आवडत नाहि, आपण घरी जेवुत म्हंटल्यावर त्यामुळे माझा रात्री जेवण्याचे विचारण्याचा प्रश्न सुटला होता. थोडक्यात म्हणजे, प्रकाशभाऊंचा जिथे राहतील त्यांचे काम सोपे करण्याचा त्यांचा स्वभाव होता. त्यांना पहिल्या जेवणात तिखटाची प्रचंड कमतरता भासली, पण त्यांनी सोबत एक अफाट तिखट लोणचं ठेवले होते. गंमत म्हणजे प्रकाशभाऊंना अल्सरचा त्रास आणि नियमित गोळ्या सुरु. पण गोळ्या सुरु असल्याने तिखट खायला हरकत नाही असा स्वत:चा ईलाज करुन बसले. एवढे तिखट खाऊन हे जोडपे प्रेमानं, गोडीनं व आपुलकिने वागणारं. मी मात्र तिखट न खाता, अत्यंत तिखट बोलणारा. तसा मी ह्या कार्यक्रमाचे आयोजन करता करता बराच मितभाषी झाल्याचे मला जाणवत होते. बघा कसे असते, आपण ज्याचे काम करतो, त्याचे आचार विचार स्वभाव यांचा आपल्यावर परिणाम होतो. म्हणुन कदाचित लोक संतसंगती करा म्हणतात. बरं असो. प्रकाशभाऊ आणि मंदा वहिनींचं जेवण आवडले तरी एका पोळी/भाकरी पलिकडे जायचं नाहि असा अलिखीत नियम असेल कदाचित. प्रकाशभाऊंनी त्यांच्या आईचा पाहुण्यांबाबतीत असलेला अनुभव स्वत:च्या आयुष्यात तत्वतः सुधारला होता. त्यांच्या आईला अनेक पाहुण्यांच्या अफाट मागण्या पुर्ण करता करता खुप धावपळ व्हायची. कोणाला अमक्याच गाईचे दुध तर कोणाला तमक्या तांदुळाचे घरी दळलेले पिठ. आईचे ते हाल पाहुन प्रकाशभाऊंनी कधी कुठे काही स्वत:साठी वेगळे मागितले नाहि. त्यातल्या त्यात हेमलकश्याला ४३ वर्ष काढुन कमीतकमी गरजांवर कसे निभवायचे हे चांगलेच आत्मसात केले होते. मोजक्याच आणि छोट्या अनुभवांनी त्यांनी दोघांनी आमच्या मनात मोठे स्थान मिळविले. मंदा वहिनींचा देव, सणवार यांत विश्वास, त्यामुळे नेमके गणपतिचे दिवस व त्यांच्या हातुन गणपती पुजा घडली. त्यांच्या वागण्यातही मार्दव आणि कमालीचा साधेपणा. अनुभव सांगतांना कधीही स्वत:चा मोठेपणा दिसत नव्हता. आणि मजेची गोष्ट अशी की बोलता बोलता मी म्हणालो की मला वेळ पाळली की परमोच्च आनंद होतो, कि प्रकाशभाऊंनी मोजक्याच शब्दात बायकांमुळे ऊशीर कसा होतो आणि बाबांना कसे वेळ काटेकोरपणे पाळलेले आवडायचं हे सांगितलं. अर्थात बाजुला मंदावहिनी असतांनाही प्रकाशभाऊंनी प्रांजळ कबुली दिल्याबद्दल माझ्या बायकोला, अनघाला हायेस वाटलं. चला घरोघरी मातीच्याच चुली. मंदावहिनींनी अपेक्षेप्रमाणे स्मितहास्याने निषेध नोंदवला. असाच कुठुनतरी भारतीय न्यूज़ चँनल्सचा विषय निघाला आणि हे जोडपहि आमच्या चँनल्सबाबतितच्या तिव्र नापसंतीत एकमत झाले. त्यांचे तेवढे एकच परखड मत मी ऐकले. तसे टिव्ही चँनल्स एकुण सगळ्यांचाच विश्वास गमावुन बसलेत. प्रकाशभाऊंनी काहीवेळा बोलतांना सांगितले की बाबांच्या कामाची तुलना मदर तेरेसाशी होऊ शकते. पण बाबांची ख़ासियत रुग्णांना आत्मविश्वास आणि स्वत:च्या पायावर ऊभे राहाण्याचे बळ देण्यात होती असेहि नमुद केले. बाबांची ईश्वरावर नसुन श्रमावर जास्त भक्ती होती. ह्या कुटुंबाची कर्मावर अफाट श्रद्धा आणि त्याचं स्त्रोत बाबा. प्रकाशभाऊंनी सांगितलं की बाबांनी जेव्हा आम्हाला काम करण्याचे स्वातंत्र दिले, तेव्हा स्वत: त्या कामातुन विरक्ति स्विकारली. कधी निर्णयामधे लुडबुड केली नाही. आता तेच धोरण स्विकारत प्रकाशभाऊं व मंदावहिनींनी दिगंत व अनिकेतला कार्यभार सोपवला. स्वत: संगोपण केलेल, कष्ट करुन वाढवलेल, रोपट्यातुन मोठा वटवृक्ष केल्यावर विरक्त भावाने त्यातुन लक्ष काढुन घेणे किती अवघड असते? पण या जोडप्याने ते कमालीच्या कौशल्याने निभावले. या विभुतिंचा मीपणा खरोखर पुर्णपणे संपलेला असणार. ४३ वर्ष सतत आदिवासी आणि प्राण्यांची चिंता वाहिल्यानंतर, स्वत्व हे कदाचित अमर्यादित होते. त्याला स्वार्थाचे बांध थोपवु शकत नाहित. त्यात सर्व जगाचे इष्ट चितंन सामावते. त्यातुन किती सुखद अनुभव येत असतिल माहित नाही. परंतु, हे किती अजब आहे पहा. हे जोडप सतत पिडितांचा विचार करणार आणि समाजातील असंख्य लोकं ह्या जोडप्याची काळजी घेणार. बाबांचे प्रकाशभाऊंनी सांगितलेले वाक्य तेव्हा प्रत्यक्षात दिसते. तुम्हि जगाकडे पाठ फिरवली तर जगहि तुमच्या पाठीशी ऊभे राहते. आम्ही जेवढे पैसे कमवले तेवढी ह्यांनी माणसं घडवली. साहाजिकच, आमचा रस्ता तोट्याचा ठरला. लंडनमधला कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. असंख्य भारावलेल्या लोकांचे आयोजनाबद्दल आम्हाला मनापासुन धन्यवाद मिळत होते. मदतही आमच्या अपेक्षेच्या पाच पट ऊभी राहिली. डॉ रोकडेंनी मनापासुन कौतुक केले. त्यांच्याही विश्वासाला खरे ऊतरलो. २० तारखेला संध्याकाळी स्लॉऊमधे गणपति ऊत्सवात आमचा कार्यक्रम अगदीच ऐनवेळेला ठेवण्यात आला होता. अर्थात त्याला त्यांच्या पदाधिकार्यांचा ऊत्साह कारणीभुत होता. पण प्रकाशभाऊंना त्यांच्या आनंदाच्या कार्यक्रमात माझे अनुभवांचे, हेमलकस्याचे दुःख कसे मांडु हा गहन प्रश्न! ही ईतरांबद्दल ईतका विचार करायची वृत्ति पाहुन आश्चर्य होते. मी आपला आयती गर्दी मिळाली म्हणुन ख़ुश होतो. मला आमटेंचे अनुयायी व्हायला बराच वेळ लागणार अशी मी माझी समजुत काढली व मी पुन्हा आनंदी झालो. बरं एवढा सगळा व्यस्त कार्यक्रम केला तो स्वतः प्रकाशभाऊ आजारी असुन. मला वाईट वाटले. कार्यक्रमाच्या धकाधकीत दुखणं अजुन बळावेल ही भितीही वाटली. पण प्रकाशभाऊंनी गोळ्या आणि कार्यक्रम दोन्हि चालु ठेवले. अमेरीकेला जातांना सोडण्यासाठी आम्ही तिन्ही कुटुंब एअरपोर्टवर गेलो. एअरपोर्टमध्ये सेक्युरीटी चेकसाठी जातांना, आम्ही मंदावहिनींना सांगितले की पाणी किंवा द्रव्य पदार्थ वेगळे काढा म्हणुन. आधी काहिच नाही म्हणाल्या. मग हळुहळु काकुंनी एकएक वस्तु काढायला सुरवात केली. प्रकाशभाऊंनी लगेच 'बघ काहीनाहिये म्हणता म्हणता, पर्समधुन बर्याच गोष्टी निघाल्या' म्हणत मंदावहिनींची खेचली. आमच्या मंडळींना पर्सची हि गंमत पाहुन स्वतःच्या पर्सच्या अपप्रसिद्धीबद्दल काहि वाटणे बंद झाले. बायकांची कितीही लहान पर्स असली तरीही त्यातही पुर्णविश्व असते, हे समजल्यावर मला तरी कृष्णाच्या तोंडात विश्व दिसल् याचं कौतुक वाटणे बंदच झाले होते. असो. बाक़ी आम्ही तसे सगळे उत्साही पण कुणाचे फार मार्गदर्शन नसल्याने या थोर व्यक्तींच्या अतिथ्यात किंवा कार्यक्रमात अनेक कळत नकळत चुका घडल्या असतिल. म्हणुन जातांना, एक गोष्ट मी न चुकता एअरपोर्टवर मागीतली आणि ती म्हणजे कुठे कार्यक्रमात किंवा इतर वेळी चुकले असेल तर त्यासाठी माफी. तर प्रकाशभाऊंनी लगेच 'हा केले माफ,आता?' म्हणुन हसतच आशिर्वाद देत हिशेब मिटवला. त्यांच्या जाण्याच्या दिवशी मात्र आम्हाला फार जड़ गेले. तसे हे दोघे आमच्या घरी जेमतेम तिन रात्री राहिले. आणि तसा हा अगदी न करमण्याचा परिणाम मला नविनच. आई, बायको, मुले कुणीही गावाला गेल तरी मी कामात स्वतःला गुंतवत असे. ईथे मात्र तसं घडल नाही. अश्या माणसांचा सहवास लाभणं ह्यात माझे किती पुण्य खर्चि पडले याची गिनती नाही पण हे नक्कीच माझे सुदैव म्हणेन. पुढे कधी ही संधी येईल माहीत नाही. पण तोपर्यंत या आठवणी नक्कीच पुरतील. 

लेख
राहुल करुरकर